|
अॅलन, सर रॉय जॉर्ज डग्लस (Allen, Sir Roy George Douglas) : (३ जून १९०६ – २९ सप्टेंबर १९८३ ) प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, संख्याशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ. त्याचा जन्म स्टोक ऑन ट्रेंट (स्टॅफर्डशर – इंग्लंड) येथे झाला. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रॉयल ग्रामर स्कूल, वॉरसेस्टर येथे झाले. सिडनी सस्सेक्स कॉलेज, केंब्रिज येथून त्याने गणितात प्रथम श्रेणीत पदवी मिळविल्यामुळे त्याला रँग्लर स्कॉलरशिप देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. त्याची १९२८ साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे संख्याशास्त्र या विषयाचा अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली. अर्थशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गणिताचा वापर करणारा तो पहिला अर्थशास्त्रज्ञ होता. संख्याशास्त्राचा अभ्यासक म्हणूनही त्याची ख्याती होती.
अॅलन याने १९३८ मधील मॅथेमॅटिकल अॅनॅलिसिस फॉर इकॉनॉमिस्ट या आपल्या ग्रंथात प्रथमच अंशत: पर्यायी लवचिकतेसंबधीची मांडणी केली. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९ ते १९४५) वॉशिंग्टन येथील ‘रेकॉर्ड अॅण्ड स्टॅटिस्टिक ऑफ ब्रिटिश कौन्सिल’ या संस्थेच्या आणि ‘कॅम ब्लड प्रॉडक्शन अॅण्ड रिसोर्सेस’ या मंडळाच्या संचालकपदी त्याची नेमणूक झाली. १९४४ मध्ये त्याने लंडन विद्यापीठात संख्याशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. १९५२ साली ब्रिटिश अॅकॅडेमीतर्फे त्याला ‘फेलो’ (अधिछात्र) म्हणून गौरविण्यात आले. त्याने रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले. १९६० च्या दशकात तो प्रसिद्ध अशा शासकीय चौकशी समितीचा अध्यक्ष होता. त्या काळात त्याने गृहकुलसंदर्भातील किंमतीच्या प्रभावाची चौकशी केली. त्या संबंधाता १९६५ मध्ये प्रकाशित झालेल्या अॅलन अहवालात गृहकुल किंमतीचा प्रभाव हा प्रतिगामी होता, असे अनुमान काढण्यात आले होते. १९६६ मध्ये त्याला अर्थशास्त्रविषयक कार्यासाठी ‘नाइटहुड’ प्रदान करण्यात आले. १९७८ साली ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’तर्फे दिले जाणारे ‘गाय गोल्ड मेडल’ (GUY GOLD MEDAL); ‘मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा संख्याशास्त्रातील पुरस्कार असे अनेक मानसन्मान व पुरस्कार त्याला मिळाले.
अॅलन याचे संख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांतील अनेक लेख व ग्रंथ प्रकाशित झाले. १९३४ मध्ये त्याने विख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ⇨ सर जॉन रिचर्ड हिक्स याच्याबरोबर अ रिकन्सिडरेशन ऑफ द थिअरी ऑफ व्हॅल्यू हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. याच कालावधीत त्याने ‘द नेचर ऑफ इनडिफरन्स कर्व्ह’ ही अर्थशास्त्रीय संकल्पना प्रथमच मांडली. स्टॅटॅस्टिक्स फॉर इकॉनॉमिस्ट (१९४९); मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स (१९५६); मॅक्रोइकॉनॉमिक थिअरी मॅथेमॅटिकल ट्रीटमंट (१९६७) हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ होत. १९८० मध्ये अर्थशास्त्रातील त्याच्या कार्याबद्दल सिडनी सस्सेक्स केंब्रिजतर्फे त्याला गौरविण्यात आले.
साउथवॉल्ड, सॅफॉल्क येथे त्याचे निधन झाले.
वढवणकर, संतोष
टिप्पणियाँ